लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे उदासिन धोरण असल्याची ओरड होत असल्यामुळे गत आठवड्यात पालिकेने अतिक्रमण निमुर्लन मोहिम हाती घेतली. मात्र, ही मोहीम प्रारंभ होण्यापूर्वीच कुठेतरी माशी शिंकली. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणारी मोहीम अद्याप सुरू न झाल्याने पाणी कुठे मुरले याचीच चर्चा शहरात सुरू आहे.खामगाव शहराचा गत काही काळापासून झपाट्याने विस्तार होत आहे. सोबतच शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकउे बेरोजगार आणि लघू व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटू लागलेत. त्यामुळे अतिक्रमणात दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, खामगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेच्यावतीने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. ११ फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमकांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू झाल्यानंतर ही दुकाने काढण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण जैसे थे!जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहर पोलिस स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवघ्या तीन दिवसांत हे अतिक्रमण जैसे थे झाले आहे.