खामगांव: विजेच्या धक्क्याने पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर कुटुंबातील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 11 आॅगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजता खामगांव शहरापासुन जवळच असलेल्या सुटाळा खुर्द परिसरात घडली. सुटाळा खु. येथे राहणारे सुभाष महादेव कळसकार वय 40 हे सकाळी 5.30 वाजता शौचालयावरुन परत आल्यानंतर घरातील विद्युत मिटरच्या अर्थिंग ताराला त्यांचा स्पर्श झाला. अर्थिंग तारामध्ये जिवंत विद्युत प्रवाह असल्याने त्यांना जबरदस्त शाॅक बसला असता त्यांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घरात असलेले त्यांचे वडील महादेव दशरथ कळसकार हे त्यांच्या मदतीला घरातुन बाहेर आले व त्यांनी सुभाष यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही विद्युत शाॅक लागला. याचवेळी घरात झोपलेले विजय महादेव कळसकार व नितीन महादेव कळसकार यांनी आरडाओरड ऐकली. ते घरा बाहेर आले असता त्यांना आपले वडील व भाउ यांना विद्युत शाॅक लागल्याचे दिसले. या दोघांनी सुध्दा त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विद्युत प्रवाहाचा जोरदार शाॅक बसला. गावकरी व शेजा-यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता वाटेतच महादेव दशरथ कळसकार वय 60 वर्षे व सुभाष महादेव कळसकार वय 40 या दोघा पिता-पुत्रांचा करुण अंत झाला. तर घटनेमध्ये गंभीर जखमी झालेले विजय महादेव कळसकार वय 24 व नितीन महादेव कळसकार वय 26 या दोघांना उपचारार्थ सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.
माजी आमदार सानंदा यांच्याकडून सांत्वनघटनेची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सामान्य रुग्णालयामध्ये जाउन कळसकार कुटुंबियांचे सात्वंन केले व घटनेत जखमी झालेल्या विजय व नितीन कळसकार यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपुस केली. यावेळी त्यांच्या समवेत बब्बु चव्हाण, तुषार चंदेल, अन्सार भाई आदी उपस्थित होते. या ह्दयद्रावक घटनेमुळे सुटाळा खुर्द गावात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व दुःख व्यक्त केले जात आहे.