- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पंतप्रधान आवास योजनेसाठी चुकीच्या प्रकल्प विकास संस्थेची नेमणूक करण्यात आल्याने गत तीन वर्षांपासून खामगावात घरकुल योजनेची कामे रखडली होती. मात्र, खामगाव पालिकेने आता नव्याने प्रकल्प विकास संस्थेची नेमणूक केली आहे. त्यामुळे सुरुवातीला खामगावातील १७५ घरकुलांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसते. खामगाव शहरातील आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी खामगाव पालिकेने मुंबई येथील ‘प्रकल्प विकास संस्थे’ची नेमणूक केली. मात्र, या संस्थेने चुकीचा अहवाल सादर केल्याने, खामगावातील आवास योजना तब्बल तीन वर्षांपासून रखडली होती. दरम्यान, घरकुल योजनेसाठी अमरावती येथील वास्तू क्रिएशनची प्रकल्प विकास संस्था म्हणून नेमणूक केली. त्यामुळे सुरुवातीला १७५ घरकुले मार्गी लावली जातील. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने घरकुलांसाठी सर्वेक्षणास प्रारंभ केला जाईल. गत अनेक महिन्यांपासूसन घरकुल लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे. तसेच बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
खामगाव येथील पंतप्रधान आवास योजना मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प विकास संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, या संस्थेने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. -मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.