लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील काही भागात तब्बल १४ तर काही भागात २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी शहरात पाण्याचा ुठणठणाट असून, संपूर्ण खामगाव शहरच ‘टँकर’ भरोसे असल्याचे चित्र आहे. परीक्षा आणि संत गजानन महाराजांच्या प्रकटदिन महोत्सवात शहरात पाणी पोहचू न शकल्याने, सामान्यांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गेरू माटरगाव येथील धरणातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे गेरू माटरगाव येथील धरणावरील जॅकवेलमध्ये अपेक्षीत जलसंचय होत नाही. त्याचवेळी खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गुरूत्त्व वाहिनीवरील लिकेज दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन दुरूस्तीमुळे १९ फेब्रुवारीपासून खामगाव शहराचा पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. तत्पूर्वी आठ दिवसांपासून शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होता. त्यामुळे शहराच्या काही भागात तब्बल २२ दिवसांपासून तर काही भागात १४ दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. सिव्हील लाईन भागात तीन आठवड्यापासून पाणी पोहोचले नाही. गोपाळ नगर आणि घाटपुरी नाका परिसरात २२ दिवसांपासून पाणी पोहोचले नाही. संपूर्ण खामगाव शहरात पाणी समस्या निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कॅन तर वापराच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येते.
खामगाव १४ दिवसांपासून ‘टँकर’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 1:58 PM