लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एनडीआरएफ आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पीकविमा न काढलेल्या शेतकर्यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.रविवारी अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे २७७ गावातील सुमारे ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर खामगाव तालुक्यातील विविध शेतीची पाहणी त्यांनी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, तालुका कृषी अधिकारी एस.एस.ढाकणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार सुनील पाटील, शत्रुघ्न पाटील, डॉ.महाले, नायब तहसीलदार देशमुख, पिंपळगाव राजा येथील ठाणेदार सुरेंद्र अहिरकर उपस्थित होते. या पाहणी दौर्याला बोथा फॉरेस्ट येथून सुरुवात झाली. येथे हरिभाऊ कांडेलकर, शत्रुघ्न कांडेलकर आणि शालीग्राम सोनोने यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नांद्री येथील सोनाजी कोळपे यांच्या शेतातील पीक नुकसानाची पाहणी करण्यात आली. काळेगाव येथील मुकुंदा गायगोळ, बेलखेड येथील सुनील मुंडे, वर्णा येथील भरतसिंह इंगळे, गेरू माटरगाव येथील विजयसिंह साबळे, श्रीधरनगर येथील गजानन गिर्हे, मुकुंदा गायकवाड यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी अधिकार्यांना तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शासन शेतकर्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत, कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी ज्ञानगंगापूर येथील अजय काशिनाथ महाले या युवकाच्या कुटुंबियांचे सात्वन केले. वादळीवार्यामुळे झाड अंगावर पडून अजय महाले याचा रविवारी मृत्यू झाला होता.
खामगाव तालुक्यातील ६0 गावांमध्ये नुकसान! खामगाव तालुक्यातील ६0 गावांमधील पिकांचे रविवारी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. यामध्ये वर्णा, कोंटी, सारोळा, दिवठाणा, वझर, श्रीधरनगर, लोखंडा, किन्ही महादेव, चिंचपूर, हिवरा बु., नांद्री, लांजुड, पोरज, काळेगाव, निमकवळा, वडजी, कुंबेफळ, भालेगाव बाजार, टाकळी तलाव, कासारखेड, शिर्ला नेमाने, निरोड, हिवरखेड, आवार, कोलोरी, अडगाव, पलशी बु., सुटाला बु, वाडी, जयपूर लांडे, कोक्ता, माक्ता, शिरजगाव देशमुख, खुटपुरी, घाटपुरी, नांद्री, मांडणी, बोथा, शेंद्री, चिंचखेड बंड, खेर्डा, बेलखेड, कंचनपूर, हिवरखेड, आवार, गेरु माटरगाव, झाडेगाव, लोणीगुरव, दत्तापूर, बोथाकाजी, सावखेड, भंडारी, उमरा, तरोडानाथ आदी गावांचा समावेश असून, शेगाव तालुक्यातील डोलारखेड, गुडगाव, वनगाव, कठोरा, चिंचखेड, भास्तन, सगोडा, हातखेड, पहुरपुर्णा, लासुरा, कासरखेड, जवला बु., जवला पलसखेड, चिंचोली, काटेपूर्णा, गौलखेड, खेर्डा आदी गावांसह सुमारे १८ गावांमध्ये नुकसान झाले.