मलकापूरमधील यंत्रणा सुस्थितीत
मलकापूर : उपजिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू भरती विभागातील अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याचे ९ जानेवारी रोजी केलेल्या पाहणीत समोर आले. उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशू भरती विभाग असून, या विभागात एकावेळी पाच शिशूंना भरती करून उपचार होऊ शकतो. या कक्षाच्या प्रवेशद्वारावर व लगतच अग्निशामक यंत्र असून, या यंत्राची क्षमता सहा किलो आहे. तर यंत्राची मुदत २१ डिसेंबर २०२१ अशी असल्याचेही दिसून आले. त्याचप्रमाणे आग लागल्यास बाहेर जाण्यास समोरून व पाठीमागून असे दोन सोईचे मार्ग आहेत.
फायर ऑडिट म्हणजे काय?
फायर ऑडिट हे संबंधित इमारत बांधल्यानंतर एकदाच हाेते. त्यानंतर तेथील उपकरणे सुरळीत आहेत किंवा नाही याची दर ११ महिन्यांनी तपासणी करून तसे प्रमाणपत्र अग्निशामक दलाकडून घ्यावे लागते.
पालिकेचा अग्निशामक विभाग हे ऑडिट करतो. पालिकेचा एक अधिकारी व सहायक अग्निशमन अधिकाऱ्याचा यात समावेश असतो.
संबंधित इमारतीची उंची व खोल्यांची संख्या विचारात घेून त्यानुसार फी आकारली जाते.
एका दिवसात पाहणी पूर्ण होते. यात तेथील पाइप योग्य आहे का? स्प्रिंकलर कार्यरत आहेत का?, पाण्याची टाकी सुस्थितीत आहे का? याची पाहणी केली जाते.
पाहणीनंतर तसे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाला किंवा विभागाला दिले जाते.
पालिकेच्या हद्दीत अशा ऑडिटसाठी कमी फी आकारली जाते. हद्दीबाहेर असेल तर वाढीव फी आकारली जाते.
पाहणीमध्ये अग्निशामक यंत्राचे प्रेशर योग्य आहे का? रीफिलिंग करण्याची गरज आहे का? यंत्राला नोझल योग्य पद्धतीने बसवलेले आहेत का, याचीही तपासणी होते.