लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भरधाव लक्झरीच्या धडकेत पती-पत्नी ठार तर एक आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव-शेगाव रोडवरील श्यामल नगर जवळ शनिवारी रात्री ९: २० वाजता घडली. खामगाव येथील चांदमारी चौकातील विजय दत्तात्रय सारस्कर(४०) त्यांची पत्नी सुलोचना आणि आठ वर्षीय मुलगा सुपेश याच्यासोबत एमएच २८ एफ- ८१८८ या दुचाकीने श्यामलनगरकडे जात होते. दरम्यान, शेगाव येथून खामगावकडे एमएच ३० एए-९९९५ याक्रमांकाची लक्झरी येत होती. यावेळी लक्झरीच्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवित दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर दुचाकी सुमारे २०-२५ फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेली. यात विजय सारस्कर जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी सुलोचना यांना सामान्य रूग्णालयात आणत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सुपेश सारस्कर(०८) हा गंभीर जखमी झाला. जखमी सुपेशवर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेविका शीतल माळवंदे, प्रितम माळवंदे, उत्तम माने, अतुल झरेकर आणि चांदमारीतील युवक घटनास्थळी पोहोचले.
डुक्कर आडवे आल्याने तिघे जखमी
भाऊ आणि वहिणीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच विजय सुपेकर यांचे बंधू अविनाश सारस्कर(४२) आपल्या धीरज आणि नक्ष या दोन मुलांसह घटनास्थळाकडे घाई गडबडीत हिरानगर येथून निघाले. रस्त्याने येत असताना हनुमान व्हिटामीनजवळ त्यांच्या दुचाकी समोर डुक्कर आडवे आले. त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात अविनाश सुपेकर आणि त्यांची दोन्ही मुलं जखमी झाली. त्यांच्या खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली.