लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या महिन्यात खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या संदर्भाने फिल्ड सर्वेक्षणासाठी आलेल्या रेल्वेच्या पथकाने बनविलेला अहवाल हा सकारात्मक असल्याचे संकेत खा. प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. दरम्यन या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मोठे उत्पन्नही मिळण्याचा अंदाज असल्याचे खा. जाधव म्हणाले.जानेवारी महिन्यात फिल्ड सर्वेक्षणासाठी रेल्वेचे हे पथक जालना व बुलडाणा जिल्ह्यात आले होते. त्यानंतर फिल्ड सर्वेक्षणाच्या अहवालासंदर्भात खा. जाधव यांनी पथकातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत काही सूचनाही दिल्या. विदर्भ मराठवाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा मार्ग असेल असे ते म्हणाले. शतकोत्तर प्रलंबित असलेला हा मार्ग व्हावा, यासाठी खा. जाधव यांनी लोकसभेत सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गतही तीन हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली होती. मात्र त्यात प्रगती झाली नव्हती. त्यामुळे हा मुद्दा खा. जाधवांनी रेटून धरला होता. त्यानंतर हे फिल्ड सर्वेक्षण झाले. हा प्रस्तावित रेल्वे मार्ग मध्य व दक्षिण रेल्वेस जोडणारा ठरणार आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, शेगावसह खामगाव, मलकापूर, चिखली या औद्योगिक वसाहती जोडणारा ठरू शकतो. हा मार्ग पुढे शेगावपर्यंत जोडण्यात यावा, अशीही अहवालात सुस्पष्टता देण्यात यावी, अशीही खा. जाधव यांनी सूचना केली आहे.
लघु उद्योगांना चालनाऔरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग वाढीमुळे बुलडाणा जिल्हयात लघु उद्योगांना चालना मिळाली आहे. जालन्यातही स्टील उद्योग वधारला आहे. ही परिस्थिती पाहता रेल्वेला मालवाहतुकीतून या मार्गावर मोठे उत्पन्न मिळू शकते. यासोबतच प्रवासी क्षमताही या भागात वाढली आहे. दरम्यान, हा अहवाल भुसावळ येथून मुंबई रेल्वे विभाग आणि तेथून रेल्वे मंत्रालयाकडे सादर होईल. तेथेही यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे खा. जाधव म्हणाले.