चिखली : तब्बल ११० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करून अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी आमदार श्वेता महाले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून केली होती. त्यानुषंगाने ९ फेब्रुवारी रोजी संबंधित विभागाच्या बैठकीत अंदाजपत्रके बनविण्यासाठी गती वाढविण्याचे आदेश परिवहनमंत्री अनिल परब दिले असल्याने या रेल्वेमार्गाला गती मिळण्याचे संकेत आहेत.
आमदार श्वेता महाले यांनी ४ मार्च २०२० रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून खामगाव-जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला सभागृहात वाचा फोडली होती. त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात या रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानुषंगाने ९ फेब्रुवारी रोजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे खासगी सचिव विद्याधर महाले, मुख्य अभियंता सुधीर पटेल, सुरेश जैन, उपमुख्य परिचलन प्रबंधक सर्वेक्षण मुख्यालय, मुंबई आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार श्वेता महाले यांच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी राज्य शासन या रेल्वेमार्गाबाबत सकारात्मक असून, सर्वेक्षण झाल्यानंतर सदर रेल्वेमार्गाचे अंदाजपत्रक तयार होईल आणि त्यानंतर केंद्र सरकारची व राज्य शासनाची भागीदारी निश्चित होईल, अशी माहिती दिली होती. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत एक महिन्यात बैठक घेण्यात येईल, असे सांगितले हाेते. परंतु कोरोनामुळे कोणत्याही बैठका घेण्यात आल्या नव्हत्या. याबाबत आमदार महाले यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. नुकतीच सर्व्हेची टीम येऊन गेली आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठक होत असल्याने खामगाव-जालना रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर होऊन खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.