खामगाव: कृषि महोत्सवामध्ये ४00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. कृषि महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्यग सदस्यांनी प्रक्रिया यंत्राच्ची माहिती उत्सुकतेने जाणुन घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल दिसून आला. याठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने संशोधित केलेली बीरहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर उर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत. संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकऱ्यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्यादृष्टीकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळ्यांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकऱ्यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी याठिकाणी शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स व्यवसाय करण्याच्या दृष्टीकोनातून मत्स विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे. कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबधीची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे झाले नुकसान पाहता, कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंड अळीचा पार्दुभाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे. याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती याठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे. (प्रतिनिधी)