गजानन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये ३0 टक्केच पाण्याचा साठा असल्याने एप्रिल व मे मध्ये पाण्याची चणचण भासु लागली आहे. औद्योगिक वसाहतीमधील नियमीत असलेला पाणी पुरवठा मागील पंधरवाड्यात तीन वेळा २४ तास बंद होता. त्यामुळे अनेक उद्योगांना झळ बसली. पाणी पुरवठा बंद होण्याचे कारण पाईपलाईन लिकेज तसेच तांदुळवाडी स्टोअरेजमध्ये पाणी नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु मुळात धरणातच पाणी साठा कमी असल्याने पाणी तोलून मापून देण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, यश एन्टरप्राईजेस, व्हि.के.ऑईल मिल व अन्य कारखान्यांना दररोज हजारो लिटर पाणी लागत असते. परंतु यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस आणि पावसाळा जूनमध्ये सुरू न झाल्यास जुनमध्ये पाण्याचा खुप मोठा तुटवडा जाणवू शकतो. याचा परिणाम अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडू शकतात. अनेक कारखाने पाणी विकत घेऊन चालवत असतात. परंतु यावर्षी जीएसटी, नोटबंदी ह्यामुळे कॅशलेस व्यवहार असल्याने ते सुध्दा अडचणीचे ठरू शकते, असे काही कारखानदारांनी मत व्यक्त केले.
सध्या पाणी पुरवठा नियमीत असून पावसाळा उशीरा सुरू झाल्यास पाणीटंचाई भासवू शकते. त्यामुळे पाण्याचा कारखानदारांनी जपून उपयोग करावा.- अविनाश डाबेरावउपविभागीय अभियंता एमआयडीसी खामगाव