लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भारतीय नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी खामगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात झाली. राष्ट्रीय एकता मंचच्यावतीने अत्यंत शिस्तबध्द व शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नुकतेच नागरिक सुधारणा विधेयक संसंदेत पारित केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर नागरिक्त सुधारणा कायदा देशात लागू झाला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय एकता मंच खामगावच्या वतीने एकता मोचार्चे आयोजन करण्यात आले सकाळी ११ वाजता शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला जिल्हा संघचालक महादेवराव भोजने, मोर्चा समितीचे अध्यक्ष सागर फुंडकर, संयोजक अॅड.अमोल अंधारे अभिवादन केले. त्यानंतर निर्मल टर्निंग, सरकी लाईन, महावीर चौक, फरशी, भगतसिंग चौक, टॉवर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चा समिती व विविध संघटनांच्या पदाधिकाºयांच्या हस्ते महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारतीय नागरीकता संशोधन कायदा २०१९ व सीएए / एनआरसी च्या समर्थनार्थ व अभिनंदनपर निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये भारतीय नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच विरोधकांनी विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच असंवैधानिक पध्दतीने विरोध, जाळपोळ, दगडफेक व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाºया व निष्पाप पोलीस अधिकारी, प्रशासनावर दगफेक करणाºया आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रीय एकता मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला, पुरुष, युवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरीक सहभागी झाले होते. यावेळी पोलिस प्रशासनातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खामगावात सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 5:36 PM