खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला. त्यामुळे पालिकेच्या उद्ययावत फर्निचरला अपशकुन झाल्याची चर्चा आता पालिकेत रंगू लागली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खामगाव येथील नगर पालिकेत अत्याधुनिक फर्निचर बसविण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. पालिकेतील अद्ययावत सभागृहासह विविध प्रशासकीय विभागामध्येही फर्निचरची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये सोमवारी सायंकाळी बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक महेंद्र महितकर आणि पाणी पुरवठा विभागाचे पर्यवेक्षक सूरजसिंह ठाकूर- भदोरीया यांच्यासाठी टेबल लावून अद्ययावत दालन तयार करण्यात आले. परंतु, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या टेबलच्या काचा फुटल्या. फर्निचरचे काम सुरू असतानाच टेबलच्या काचा फुटल्याने अद्ययावत फर्निचरला अपशकुनाचे गालबोट लागले, अशी चर्चा आता पालिकेत रंगू लागली आहे.