- अनिल गवई खामगाव : मालमत्ता कराच्या अपेक्षीत उद्दीष्टपूर्तीसाठी खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशीही धडक वसुली मोहिम राबविण्यात येणार आहे. मोठ्या थकबाकीदारांकडील वसुलीसाठी ४५ जणांचे जम्बो पथक गठीत करण्यात आले असून, रविवारी या वसुली मोहिमेस प्रारंभ होईल.मालकत्ता कराच्या वसुलीत खामगाव पालिका सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पालिकांमध्ये आघाडीवर आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला खामगाव पालिकेने कर वसुलीचे ६५ टक्के उद्दीष्ट गाठले. यासाठी प्रत्येकी सहा जणांचा समावेश असलेल्या ६ पथकं गठीत करण्यात आले होते. शहराच्या विविध भागात परिसरनिहाय या पथकाने कर वसुली केली. मात्र, काही मोठ्या थकबाकीदारांकडून मिळत असलेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे आता ६ पथकं आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘जम्बो’ पथकाचे गठण करण्यात आले आहे.एक लाखाच्यावर थकबाकी असलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पालिकेचा अल्टिमेटम झुगारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचा सुत्रांचा दावा आहे.नगर पालिका कर विभागाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांत १० कोटी ६६ लक्ष रुपयांचे उद्दीष्ट ठेवले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरूवातीला पालिका प्रशासनाने ६ कोटी ६० लाख ४०८५३ रुपयांची कर वसुली केली. तथापि, मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुली अपेक्षीत असल्याने, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कर वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.मोठ्या थकबाकीदारांची यादी झळकणार!मार्च अखेरीस शंभर टक्के कर वसुलीच्या अपेक्षेने पालिकेने वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असल्याचे दिसून येते. वसुली पथकाला अपेक्षीत सहकार्य न करणाºया कर दात्यांना आता दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, कर वसुली मोहिमेत सहकार्य न करणाºयांची नावे फलकावर झळकविण्यात येणार आहे.
शंभर टक्के कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. कर वसुली मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद आवश्यक आहे. अपेक्षीत सहकार्य न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल. रविवारीही वसुली मोहिम राबविण्यात येईल.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.