लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मान्सूनपूर्व नालेसफाईकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत असून, गतवर्षी अर्धवट सफाई करण्यात आलेल्या नाल्यांमध्ये अद्यापही पालिकेची यंत्रणा पोहोचली नसल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या रिअॅलिटी चेकमध्ये सोमवारी समोर आली.खामगाव नगरपालिका प्रशासनाकडून नालेसफाईला २५ जूनपासून सुरुवात करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासून नालेसफाई ढिम्म गतीने सुरू आहे. परिणामी, एका मोठ्या नाल्याचा अपवाद वगळता शहरातील उर्वरित नाल्यांमध्ये पालिकेची यंत्रणा पोहोचलीच नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी सतीफैल भागातील मोठ्या पुलाजवळील नाल्याची अर्धवट सफाई करण्यात आली. अर्धवट नालेसफाईबाबत त्यावेळी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खामगावच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराची कानउघाडणीही केली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नालेसफाईबाबत असमाधान व्यक्त केले होते. दरम्यान, नालेसफाईला २० दिवसांचा कालावधी लोट्यानंतरही शहरातील बहुतांश नाल्यांच्या स्वच्छतेस अजिबात सुरुवात झालेली नसल्याचे दिसून येते.
नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. नालेसफाईत कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. नालेसफाईवर आरोग्य विभागाचा वॉच राहील. काम पूर्णत्वास न गेल्यास कंत्राटदाराचे देयक थांबविले जाईल.- मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.