लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील नगरपालिकेच्या कर विभागाने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ६३ टक्के कर वसुली केली आहे. मात्र, शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून पालिकेला शंभर टक्के वसुली करण्यास यश साध्य होणार नसल्याचे संकेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका मालमत्ता कराच्या वसुलीला बसला आहे.नगरपालिका कर विभागाच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांत १० कोटी २१ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत नगरपालिका प्रशासनाने ६३ टक्के कर वसुली केली असून अद्याप ३७ टक्के कर वसुली बाकी आहे. मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुली अपेक्षित आहे. त्यानुसार नगर पालिका प्रशासनाच्या वतीने कर वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. मोठ्या थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत.
करवसुलीवर कोरोनाचे सावट! गतवर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे खामगाव शहरातील मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांची वसुली थकली होती. कर वसुलीचा गाडा सुरळीत करताना पालिका प्रशासनाचे प्रयत्न असतानाच, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात कर वसुलीवर कोरोनाचे सावट असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
पालिकांना कोरोनाचा फटकाबुलडाणा जिल्ह्यात ११ नगरपालिका आणि ०२ नगरपंचायती आहेत. या नगरपालिकांतर्फे शहरवासियांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांसाठी मालमत्ता, शिक्षण, रोहा, वृक्ष, घनकचरा आदी संदर्भातील करवसुली केली जाते. गतवर्षी सर्वत्र कोरोनाने कहर केल्याने याचा परिणाम नगर परिषदेच्या करवसुलीवरही झाल्याचे दिसून येते.