- अनिल गवई
खामगाव: पालिकेच्या सभेतील गैरवर्तनासोबतच सभेत नारेबाजी करण्याच्या प्रकारावरून नगराध्यक्षांनी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे पालिकेचे राजकारण तापले असून, काही नगरसेवकांनी नोटीस घेण्यास टाळाटाळ चालविली आहे.
खामगाव नगर पालिकेवर भाजपची सत्ता असून काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका अदा करीत आहे. विकास कामांवरून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये मतभेद आहेत. दरम्यान, पालिकेच्या सभेतही अनेकदा काँग्रेस-भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद होतात. या वादाचे पर्यवसन शाब्दीक चकमकीपर्यंत पोहोचते . सत्ताधाºयांच्या ठरावाला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोधही केला जातो. यामध्ये काही नगरसेवक टोकाची भूमिका घेतात. परिणामी, सभागृहात विरोधकांकडून नारेबाजी केली जाते. हा प्रकार वारंवार घडत असल्याचे कारण पुढे करीत, खामगाव नगर पालिकेच्या नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांनी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये ११ नगरसेवकांसोबतच एका स्वीकृत नगरसेविकाचाही समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (१) अन्वये शासनाकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव का पाठविण्यात येवू नये, असे नोटीसमध्ये नमूद करीत, महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (३) अन्वये नोटीस बजावली असून, या नोटीसचे १० तारखेपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा!
सभेतील गैरवर्तन, नारेबाजी आणि सभेच्या निषेध प्रकरणी आपणाला सदस्यपदावरून दूर करण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (१) अन्वये शासनाकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव का पाठविण्यात येवू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. सोबतच कायदेशीर कारवाईचाही इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
नोटीस घेण्यास टाळाटाळ!
नगराध्यक्षांची स्वाक्षरी असलेली नोटीस तीन नगरसेवकांनी स्वीकारली असून, काही नगरसेवक ही नोटीस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षांच्या नोटीसमुळे पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुर्वग्रह दृष्टीकोनातून सभा बेकायदेशीर ठरविण्यासाठी काँग्रेस नगरसेवक खटाटोप करीत असल्याचा आरोप सत्ताधाºयांकडून केला जात आहे.
विरोधाला विरोध म्हणून काँग्रेस नगरसेवक वागत आहेत. वारंवार सूचना देवूनही त्यांच्या वर्तणुकीत कोणताच फरक पडत नसल्याने काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
- अनिताताई डवरे, नगराध्यक्ष, खामगाव.