बुलडाणा - खामगाव येथील आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचा-यांनी मंगळवारी आगारात कामबंद आंदोलन पुकारले. त्याचवेळी पंढरपूर येथे विलंबाने सोडण्यात येत असलेल्या गाड्यांचा प्रश्न घेवून भाजप कार्यकर्ते आगारात धडकले. चर्चा सुरू असतानाच विभाग नियंत्रकांच्या उपस्थितीत आगार व्यवस्थापक आर.आर.फुलपगारे आणि आंदोलनकर्त्यांत चांगलीच बाचाबाची झाली. यात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत आगार व्यवस्थापकांना मारहाण झाल्याने आगारात चांगलेच वातावरण तापले.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराचे व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एसटी कर्मचा-यांनी मंगळवारी सायंकाळी खामगाव आगारात काम बंद आंदोलन छेडले. दरम्यान, खामगाव बस स्थानकातून सुटणाºया विविध बसेस प्रभावित झाल्या. दरम्यान, पंढरपूर येथे जाणा-या गाड्याही विलंबाने सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळीच आगार व्यवस्थापकांची खामगावचे तहसीलदार शीतल रसाळ आणि पोलिस निरिक्षक संतोष टाले यांच्या उपस्थितीत आमदार आकाश फुंडकर यांनी पेशी घेतली होती. त्यानंतर लागलीच मंगळवारी पुन्हा पंढरपूरकडे जाणाºया बसेस लेट झाल्या. परिणामी, वारक-यांना मंगळवारीही एसटी स्थानकावर तात्कळत बसावे लागले. याबाबत तक्रारी प्राप्त होताच, आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्या कानावर हा प्रकार घातला. खामगाव आगारातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच, विभागक नियंत्रक संदीप रायलवार आपल्या पथकासह बुलडाणा येथून खामगाव एसटी आगारात पोहोचले.त्यावेळी एसटी कर्मचाºयांचे काम बंद आंदोलन सुरू होते. विभाग नियंत्रक आगारात पोहोचल्याचे समजताच बसस्थानकावर आंदोलनाच्या पावित्र्यात असलेले भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आगारात पोहोचले. यावेळी विभाग नियंत्रक आणि आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत आगार व्यवस्थापकांची कान उघडणी सुरू असतानाच, आंदोलन कर्ते कर्मचारी आणि भाजप पदाधिकारी आगार व्यवस्थापकांच्या कक्षात घुसले. यावेळी आगार व्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या अंगावर आॅईलही फेकण्यात आले. मात्र, विभाग नियंत्रकांनी वेळीच मध्यस्थी करून प्रकरण नियंत्रणात आणले. आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या विरोधात हे नियोजित षडयंत्र असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
निलंबनासाठी आमदार फुंडकरांचा आगारात ठिय्या! आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, यामागणीसाठी आमदार आकाश फुंडकर आणि संतप्त भाजप पदाधिकाºयांनी एसटी आगारात ठिय्या दिला. यावेळी परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांच्याशीही संपर्क करण्यात आला. एसटीतील वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर विभाग नियंत्रक रायलवार यांनी बुधवारी सकाळपर्यंत निलंबनाचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलनकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.मंगळवारी त्यांना बसायला खुर्चीही देण्यात आली नव्हती. आगार व्यवस्थापक फुलपगारे यांना यापूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आगार व्यवस्थापकांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे एका महिला कर्मचा-याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे शिवाजी आनंदे यांनी यावेळी केला. तसेच काही कर्मचाºयांनी आगार व्यवस्थापक सुट्टी मंजुर करण्यासाठी पैसे घेत असल्याचे सांगितले.