खामगाव : येथील पंचायत समितीमधील पंचायत विस्तार अधिकारी डाबेराव यांना निलंबित करण्यात आले आहे. शेषफंड समाजकल्याण योजनेमधून बोगस लाभार्थी निवडून अनुदान वाटपात घोळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये कृषी विभागामार्फत एससी व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जि.प.व पं.स.च्या शेषफंडातून कृषी साहित्य वाटप केले जाते.त्या अनुषंगाने १०६ लाभार्थ्यांना एचडीपीई पाईप व ४७ लाभार्थ्यांना विद्युत पंपासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यास ११ नोव्हेंबर २०१६ च्या पं.स.च्या सभेत तत्कालिन सत्ताधाऱ्यांकडून मंजुरात देण्यात आली.सदर लाभार्थ्यांची यादी १६ मार्च रोजी प्रकाशित झाली असता त्यात एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी दिसून आले. यात चक्क पती, पत्नी, माय-लेक, सख्खे भाऊ , मुलगा व वडील अशा लाभार्थ्यांचा समावेश असल्याने याबाबत तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे जि.प. व पं.स. मध्ये खळबळ उडाली होती.दरम्यान या बाबीची गंभीर दखल घेवून गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांनी सहायक गटविकास अधिकारी काळपांडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरुन काळपांडे यांनी चौकशी सुरु केली असता डाबेराव यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे डाबेराव हे दोषी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी शिफारस काळपांडे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी ९ मे च्या आदेशानुसार डाबेराव यांना निलंबित केले आहे. निलंबनानंतर डाबेराव यांच्यावर फौजदारी कारवाई सुध्दा केली जाणार असल्याचे समजते.
खामगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निलंबित
By admin | Published: May 13, 2017 1:47 PM