लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरासाठी जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या खामगाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला बुधवारी पुन्हा गळती लागली. त्यामुळे गोपाळ नगर आणि शौकत कॉलनी परिसरातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.
खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनद्वारे जळकाभंडग येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यात येते. त्यानंतर घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येते. येथून वामननगर बुस्टरपंपापर्यंत आणि त्यानंतर शहराच्या विविध भागात झोन निहाय पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी शहरात अंतर्गत पाईपलाईन बसविण्यात आली आहे. या पाईपलाईनला बुधवारी सकाळी ११: ३० वाजता दरम्यान मोठ्याप्रमाणात गळती लागली. त्यामुळे पाण्याचा मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. तसेच शौकत कॉलनी आणि गोपाळ नगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
कंत्राटदाराच्या चुकीचा नागरिकांना फटका!
पाईपलाईन दुरूस्ती तसेच देखभाल करणाºया कंत्राटदाराने पालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता पाईपलाईनचे काम सुरू केले. त्यामुळे या पाईपलाईनला दंडेस्वामी मंदिराजवळ मोठ्याप्रमाणात गळती लागली. परिणामी, पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय झाला. सोबतच शौकत कॉलनी आणि गोपाळ नगर भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.