लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खामगाव शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बुधवारी सकाळी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १७ आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी अटक करण्यात आलेल्या तीनपैकी एकास जालना जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे खामगाव येथील भूखंड घोटाळ्याचे लोण दूरवर पसरल्याचे दिसून येते.खामगाव भाग-१ चा तत्कालीन तलाठी राजेश चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मूळ हस्तलिखित ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. याद्वारे खामगाव उपविभागातील ९४ पेक्षा अधिक सातबाऱ्यांची मालकी बदलवून दुसऱ्यांच्या नावावर खरेदी करून देणाऱ्या वरिष्ठांचीही दिशाभूल केली. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गतवर्षी डिसेंबरअखेरीस १४ आरोपींना अटक करण्यात आली. बुधवारी आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन आरोपींना चिखली तालुक्यातील कोलारा येथून अटक करण्यात आली आहे, तर एकास डोलखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना येथून अटक केली आहे. खामगाव शहर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, एएसआय रमजान चौधरी, एनपीसी दिनकर वानखडे, मोनिका किलोलिया यांनी अटक केली.
आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी! भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधार राजेश ज्ञानदेव चोपडे (५१), रा. रॅलीज प्लॉट खामगाव, ललित शेषराव झाडोकार (४०), स्वप्नील शेषराव झाडोकार (३७), दोघेही रा. संजीवनी कॉलनी, खामगाव, लक्ष्मण प्रल्हाद फाळके (६४), रा. टाकळी हाट, ता. शेगाव, देवीदास किसन राजनकर (६९), मुकिंदा हरीश्चंद्र उमाळे (५०), समाधान शंकर वाघ (७०), तिघेही रा. पातुर्डा खुर्द, ता. संग्रामपूर, रमेश वासुदेव राऊत (४५), रा. पारखेड, ता. खामगाव, प्रभाकर मुकदन पिसे (४९), रा. पाडसूळ, ता. शेगाव, शैलेश श्रीकृष्ण चोपडे (२९), रा. वृंदावननगर, वाडी, ता. खामगाव, गोपाळराव पांडुरंग तायडे (८५), रा. हिंगणा निंबा, ता. बाळापूर, जि. अकोला, गुलाबराव हरिभाऊ क्षीरसागर (७०), रा. रोहीणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा, दिलीप रामकृष्ण लोखंडे (५९), सुरेश रामकृष्ण लोखंडे (५०), दोघेही रा. हिंगणी बु., ता. तेल्हारा, जि. अकोला, रमेश रामभाऊ गवई (५०), भीमराव उत्तम मघाडे (४९), दोघेही रा. कोलारा, ता. चिखली आणि डिगंबर देवराव भांबळे (६०), रा. डोलखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.