लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी गुरूवारी सकाळी शहर पोलिसांनी अतिक्रमक आणि काही बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली. मात्र, कारवाई होऊन काही वेळ उलटत नाही, तोच शहरातील परिस्थिती पूर्ववत झाली.खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गत आठमहिन्यांपासून सुरूवात झाली आहे. सुरूवातीला रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आल्यानंतर आता रस्ताकामाला कंत्राटदाराकडून सुरूवात करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळेत कंत्राटदाकडून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे बस स्थानक चौक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते जलंब नाका आणि जलंब नाका ते सुटाळा पर्यंत वाहतुकीची चांगलीच कोंडी होत आहे. परिणामी, शालेय विद्यार्थी आणि वाहन धारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई!शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले गुरूवारी सकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. शहर पोलिस स्टेशन ते बस स्थानकापर्यंत रस्त्यावर उभी असलेल्या अनेक वाहनधारकांवर त्यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस आणि शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली. यावेळी दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांची हवा सोडण्यात आली.
रस्त्यावरील अतिक्रमणही केले मोकळे!पोलिस कारवाई दरम्यान, नांदुरा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद कॉम्पलेक्स स समोर काही अतिक्रमकांवर कारवाई करण्यात आली. विविध दुकाने आणि स्टॉल लावण्यासाठी करण्यात आलेले कच्चे अतिक्रमण तोडण्यात आले. मात्र, पोलिस कारवाईच्या काही वेळानंतर पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी जैसे थे झाली. अपघात टाळण्यासाठी नियमित कारवाई व्हावी!रस्ता विस्तारीकरणात एकाबाजूने रस्ता खोदण्यात आला. तर दुसºया बाजूने विविध दुकाने आहेत. या दुकानांच्या समोर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्ता अरूंद झाला असून या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियमित पोलिस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.