- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत नोकरी गमविलेल्यांना रोजगार देण्यासाठी खामगाव पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोरोना कालावधीत नोकरी गेलेल्यांसोबतच बेरोजगार असलेल्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ‘एक रोजगार गरजुंसाठी’ हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्यावतीने राबविण्यास सुरूवात केली आहे. अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या संकल्पनेतून सुरूवात करण्यात आलेल्या या उपक्रमाला खामगाव शहरातील अनेक सृजनशील आणि संवेदनशील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, काही बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमले आहे. हाताला काम देण्यासाठी पोलीस दादांच्या या उपक्रमाने शहरात बाळसे धरले असले तरी, सामाजिक संवेदनशीलतेमुळे पोलीसांचा हा उपक्रम अल्पावधीतच समाजमनाला भावला आहे. शहरी भागातील बेरोजगार आणि नोकरी गमावलेल्यांना यामुळे लाभ होणार आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातही राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरोना काळात रोजगार गेल्यामुळे अनेकांनी व्यवसाय बदलले आहेत. काही आॅटोचालक भाजी व्यवसायात गुंतले होते. तर उद्योग बंद पडल्याने तसेच अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याने सामाजिक समतोल बिघडला आहे. अशा परिस्थितीत समाजाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी बेरोजगार हाताला ‘रोजगार’ देण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. या उपक्रमासंदर्भात यासाठी २५ हजार पत्रके वितरीत करीत जनजागृती करण्यात येत आहे.
व्यावसायिकांकडून प्रतिसाद!खामगाव शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसी कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मात्र, कॅमेरे बसवून समस्या सुटणार नाही, हे निदर्शनास येताच शहरातील बेरोजगारांना काम देण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रोजगार मिळाल्याने अनेकजण गुन्हेगारीपासून परावृत्त होतील,अशी अपेक्षा पोलिसांना आहे.
‘एक कॅमेरा शहरासाठी, एक रोजगार गरजुसाठी’ आणि ‘नो मास्क नो बिझनेस’ अशा दोन नवीन संकल्पना खामगाव येथे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला खामगाव शहरातील व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आहेत.- हेमराजसिंह राजपूत अपर पोलीस अधिक्षक, खामगाव.
शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून दोन नवीन उपक्रम राबविण्यास सुरूवात करण्यात आली. शहर पोलीस स्टेशनला बैठकही घेण्यात आली. बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यास अनेक व्यावसायिकांनी अनुकुलता दर्शविली.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव.