- अनिल गवई
खामगाव : कंत्राटदाराने मंजूर केलेल्या नकाशात १ बीएचके म्हणून नोंद असलेल्या एका फ्लॅटची चक्क ३ बीएचके म्हणून खरेदी करण्यात आली. त्यामुळे खामगाव येथील निबंधक कार्यालयात दस्तवेज न तपासताच खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याची वस्तुस्थिती उघड झाली. या गंभीर प्रकरणाचे बिंग फुटताच शहरात एकच खळबळ उडाली असून, बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहे.
खामगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटदाराच्या मंजूर नकाशाच्या आधारावर खरेदी विक्रीचे व्यवहार करून दिल्या जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात असे व्यवहार नित्याचाच भाग झाल्यामुळे शासनाच्या मुद्रांक शुल्काचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक नंदकिशोर दुबे यांनी विकसित केलेल्या एका व्यापारी संकुल आणि सदनिकेतील फ्लॅटचे खरेदी खत मंजूर नकाशाच्या आधारावर तयार केले आहे. यामध्ये कारपेट एरीया ४०३.८२ चौरस ्रफूट असलेला थ्री-बीएचके प्लॅट (सेलेबल कारपेट एरीया ८३७.०० चौ. फूट) आहे. मात्र, दुय्यम निबंधक, खामगाव क्रमांक-१ यांनी या सेलेबल कारपेट एरीयावर मुद्रांक शुल्काची आकारणी करून शुल्क शासन खजिन्यात भरून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात सेलेबल कारपेट एरीया खरेदीखतात दाखविल्या प्रमाणे नाही. ती त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शासन स्टॅम्प ड्युटीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात खामगाव येथील दुय्यम निबंधक एस.एस.गुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. शहरातील एका संपत्तीच्या फसवणूक प्रकरणात दुय्यम निबंधक एस.एस.गुप्ते यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पालिकेच्या स्थळ निरिक्षण अहवालात गंभीर आक्षेप!
नगर पालिका प्रशासनाच्यावतीने भोगवटदार प्रमाणपत्रासंदर्भात संबधित कंत्राटदाराच्या अर्जावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. पालिकेचे बांधकाम उप अभियंता कुळकर्णी यांनी ३ सप्टेंबर २०१८ रोजी केलेल्या स्थळ निरिक्षणात इमारत बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे निरिक्षण नोंदविले आहे. सोबतच इमारतीला खिडक्या, दरवाजे, कलर, चेंबर, टाईल्स आदी कामे अपूर्ण असल्यामुळे सद्यस्थितीत इमारत राहण्यायोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. इमारत पूर्ण झाल्यावर भोगवटदार प्रमाणपत्र देणेबाबत योग्य ती शिफारस करता येईल, असे निरिक्षण नोंदविले आहे.
आयकर विभागाचेही दुर्लक्ष!
खरेदी खताप्रमाणे स्थळ निरिक्षण केले असता, नकाशात कमी जागेच्या नोंदणीपेक्षा जास्त जागेचा ताबा दिल्या जात आहे. शहरात अशा प्रकारचे व्यवहार मोठ्याप्रमाणात वाढीस लागलेत. मात्र, याकडे आयकर विभागाचे दुर्लक्ष आहे. अलिकडच्या काळात असे व्यवहार वाढीस लागले असून, काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही जणांकडून ही शक्कल लढविली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
वरिष्ठ स्तरावर तक्रारी!
खामगाव शहरात उघडकीस आलेल्या या गंभीर प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते नंदू भट्टड यांनी संचालक, नगर पालिका प्रशासन, मुंबई, विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली आहे.
नकाशात नोंद केलेल्या कमी फुटाच्या जागेचा प्रत्यक्षात जास्त ताबा देण्यात आल्याचे खरेदी खतावरून दिसून येते. पालिकेच्या स्थळ निरिक्षण अहवालातही यासंदर्भात गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे याप्रकरणी दुय्यम निबंधकांनी कारवाई प्रस्तावित करावी, अशी अपेक्षा आहे.
- नंदू भट्टड, तक्रारकर्ता, खामगाव.