- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘हेल्थ केअर’वर्कर आणि फ्रंन्टलाइन कामगारांच्या लसीकरणात खामगावातील काही धनाड्यांनी हात धुवून घेतल्याचा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार खामगावात उघडकीस आला आहे. कागदोपत्री बनावट हेल्थ वर्कर बनत, काही नामांकित श्रीमंत कुटुंबातील व्यक्तींनी खºया हेल्थ वर्करच्या हक्काची लस पळविण्याची जोरदार चर्चा आता आरोग्य वर्तुळात होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रासोबतच संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून टप्प्याने लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंन्टलाईन कामगारांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. खामगाव शहरातील लसीकरणाच्या या टप्प्यात शहरातील काही सधन कुटुंबातील व्यक्तींनी लसीकरण केले. या धनाड्यांच्या लसीकरणासाठी काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेतला. काहींनी आपल्या ‘मैत्रीं’चा धागा घट्ट करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावल्याचेही दिसून येते. कोरोनाच्या धास्तीने शहरातील काही धनाड्य चक्क एका नामांकित रूग्णालयात कागदोपत्री कर्मचारी बनलेत. तर एका धनाड्यांचा मुलगा दुसºया एका रूग्णालयात वार्ड बॉय बनला. अशाप्रकारे १६ ते ३० जानेवारी दरम्यान कागदाला कागद जोडून १४ धनाड्यांचे बनावट हेल्थ केअर वर्कर म्हणून लसीकरण झाले.
लसीकरणासाठी हॉस्पीटलमध्ये बनले कामगार!-खामगाव शहरात नावलौकीक असलेल्या आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका धनाड्य कुटुंबातील चक्क ७ जणांनी हेल्थ केअर वर्कर म्हणून लसीकरण केले. यासाठी शहरातील एका नामांकित सर्व सुविधायुक्त हॉस्पीटलमध्ये कामगार म्हणून कागदोपत्री नोकरी पत्करली. तर शहराच्या मध्य वस्तीतील एक युवा उद्योजक चक्क एका खासगी रूग्णालयात वार्ड बॉय तर दुसरा एक व्यक्ती पर्यवेक्षक बनला. त्याचप्रमाणे उर्वरीत ०५ जणांनी अशाप्रकारेच बनावट कागदपत्रे जोडून लसीकरण केले.
-हेल्थ केअर वर्करच्या जागी धनाड्य आणि त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरणाचा प्रकार गंभीर आहे. काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपले कुटुंबीय आणि मित्रमंत्रळींचे रूग्णालयात कामगार म्हणून लसीकरण केल्याची चौकशी केली जाईल. कारवाई करीत तक्रारदारांचे तात्काळ समाधान केले जाईल.- डॉ. बाळकृष्ण कांबळेजिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा.