लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहराबाहेर निर्माण झालेल्या नवीन वस्त्यांमधील रस्त्यांचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. गत उन्हाळ्यात पावसाळ्यापुर्वी रस्ते बांधकामाचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही रस्ते बांधण्यात आले नाहीत. परीणामी सध्या या भागातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. गुरूदत्त नगरसह परिसरातील नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.खामगाव शहराच्या आजुबाजूने गत काही वर्षांपासून अनेक नवीन लोकवस्त्या निर्माण झाल्या आहेत. घाटपुरी परिसरात गुरूदत्त नगर, चोपडेच्या मळयामागील वस्ती, नवनाथ मंदिरामागील वस्ती यासह अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना सुविधा मिळताना दिसत नाहीत. परिणामी या भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. समस्या सोडविण्याचे वेळोवेळी आश्वासन मिळत असले, तरी समस्या काही पिच्छा सोडताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे शहरालगतच्या या नवीन वस्त्यांमध्ये अनेक पक्की घरे झालेली आहेत. घरांची संख्याही मोठी आहे. परंतु नागरिकांना अद्याप सुविधा मिळाल्या नाहीत. पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर चिखल होतो. सध्या नागरिकांना चिखलातून गाड्या तर सोडा, परंतु चालणेही मुश्किल होत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी अनेकदा त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नसल्याचे दिसून येते. नवीन वस्त्यांमधिल पाणी समस्याही गंभीर रूप धारण करते. या भागात अद्याप नळ पोहचले नाहीत. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी व्हॉल्व्हवर उन्हातानात उभे राहावे लागते. मतदानाच्या वेळी होते आठवण!नवीन वस्त्यांमधिल समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. नागरिक जेव्हा मुद्दा उपस्थित करतात, तेव्हा हा भाग नगर परिषदेअंतर्गत की ग्राम पंचायत अंतर्गत, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र मतदानाच्या वेळी मात्र हा मुद्दा उपस्थित होत नाही. तेव्हा या भागातील नागरिकांची आठवण केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. दरम्यान विकास कामांसाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
खामगाव : नवीन वस्त्यांचा रस्ता प्रश्न सुटेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 4:07 PM