लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील अवैध नळ जोडणींकडे पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा आपला मोर्चा वळविला आहे. बाळापूर फैलातील अैवध नळ जोडणी घेणाºयांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली. बाळापूर फैलात मंगळवारी ऐन सकाळी पालिकेचे पथक धडकल्याने एकच खळबळ उडाली होती.
शहरातील अवैध नळ जोडणींमुळे वैध कनेक्शन धारकांना पाणी वाटपात अडसर निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींप्रमाणे उन्हाळ्यात पालिकेने तीनवेळा अवैध नळ जोडणीस प्रतिबंध घातला होता. त्यानंतर पुन्हा अवैध नळ जोडणीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर मंगळवारी सकाळी बाळापूर फैलातील अवैध नळ कनेक्शन शोधण्यात आले. यावेळी काही अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाई करण्यात आली. पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा पर्यवेक्षक सुरजसिंह भदोरीया यांनी ही कारवाई केली. या कारवाईचा निषेध म्हणून काही नागरिकांनी विरोधही दर्शविला. काहींनी कारवाई सुरू असताना नळ जोडणी कापण्यास तीव्र विरोध दर्शविला.
नागरिकांचा गोंधळ!
नगर पालिका प्रशासनाच्या अवैध नळ जोडणी शोध मोहिमेदरम्यान, काही नागरिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नियमित पाणीपट्टी कर भरणाºया नागरिकांचे कनेक्शन जसै थे ठेवण्यात आले. तर कराचा भरणा न करणाºया आणि पावती नसलेल्या सहा जणांची अवैध नळ जोडणी कापण्यात आली.
राजकीय दबावातून कारवाईला स्थगिती!
नगर पालिका प्रशासनाच्यावतीने अवैध नळ जोडणी शोध आणि कापणी मोहिम सुरू असताना ही मोहिम थांबविण्यासाठी प्रयत्न झाले. बाळापूर फैलातील दोन नगरसेवक तात्काळ घटनास्थळी धडकले. अवैध नळ जोडणी पैशांचा भरणा करून वैध होईपर्यंत या मोहिमेला स्थगिती दिली जावी, अशी भूमिकाही नगरसेवकांनी मांडली. त्यामुळे या मोहिमेला स्थगिती दिली.
‘तार्इं’ची तक्रार आणि ‘दादां’चा फोन!
बाळापूर फैलात अवैध नळ जोडणी शोध मोहिम राबविण्यात येत होती. त्यावेळी या भागातील नगरसेविका ‘ताई’ने पालिकेचा कारभार हाकणाºया ‘दादां’कडे तक्रार केली. तार्इंचा फोन येताच ‘दादां’नी तात्काळ पालिका अधिकाºयांना फोन केला. त्यानंतर या मोहिमेला स्थगिती मिळाल्याची चर्चा बाळापूर फैलात होती.