खामगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेत संकुलाची उभारणी करताना नकाशावर असलेल्या पार्कींगच्या जागेत दुकाने थाटल्या जाताहेत. मात्र, या प्रकाराकडे नगर पालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. परिणामी, बाजारपेठेतील पार्कींगची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असल्याचे वास्तव आहे.
खामगाव शहरातील व्यापारी संकुलासमोरील अस्ताव्यस्त पार्कींगची समस्या कायम असतानाच, दुसरीकडे मुख्य बाजारपेठेत नव्याने उभारणी केल्या जाणाºया व्यापारी संकुलातील पार्कींगची समस्येचेही अतिशय बिकट स्वरूप समोर येत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुरक्षा विषयक दृष्टीकोनातून नवीन नियमानुसार व्यापारी संकुलातील तळ मजल्यावर पार्कींग असल्याशिवाय बांधकाम परवानगी दिली जात नाही. मात्र, असे असतानाही शहरातील मुख्य बाजारपेठेत नव्यानेच उभारण्यात येणाºया व्यापारी संकुलांमध्ये बांधकाम परवानगी घेताना पार्कींगची जागा दाखविण्यात येते. मात्र, त्यानंतर या जागेचा दुकानांसाठी वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. थोडक्यात बांधकाम परवानी घेताना सादर करण्यात आलेल्या नकाशानुसार बांधकाम न करता, पार्कींगच्या जागेचाही दुकानांसाठी वापर होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, याकडे नगर पालिका बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने!नगर पालिकेत बांधकाम परवानगी घेताना सादर करण्यात आलेल्या नकाशात बदल करून शहरातील मुख्य रस्त्यावर पार्कींगच्या ठिकाणी दुकाने उभारण्यात आलीत. या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या संकुल धारकांवर तसेच व्यावसायिकांवर पालिकेचा कोणताही वचक नसल्याचे दिसून येते.
व्यापारी संकुलासमोर पार्कींगची समस्या!
शहरात पार्कींग नाही, अशातच व्यापारी संकुलासमोरील जागांना अतिक्रमणाचा विळखा आहे. त्यामुळे या संकुलासमोर पार्कींगची समस्या नेहमीच निर्माण होते. अस्ताव्यस्त पार्कींगमुळे मुख्य रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यामुळे अनेकदा अपघातही घडत असल्याचे दिसून येते.
नकाशात असलेल्या पार्कींगच्या जागी दुकान थाटल्याचे निर्दशनास अथवा यासंदर्भात तक्रार आल्यास पालीकेकडून कारवाई प्रस्तावित केली जाते. बांधकाम विभागातील अपुºया मनुष्यबळा अभावी काही तक्रारींचे निराकरणही रखडले आहे.
- निरंजन जोशी, नगर अभियंता, नगर परिषद, खामगाव.