सदानंद सिरसाटखामगाव : देशासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या चंद्रयान मोहिमेच्या यानातून खामगावात तयार झालेल्या सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूब्ज (नळ्या) नी अवकाशात झेप घेतली आहे. या झेपेसोबतच मोहिमेत खामगावातील उद्योगांनी दिलेले योगदानही अधोरेखित झाले आहे.
विजेचा सुवाहक असलेल्या चांदी धातूच्या ट्यूबची निर्मिती खामगाव औद्योगिक वसाहतीतील श्रद्धा रिफायनरीमध्ये झाली आहे. अवकाश संशोधनात अंत्यत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या चंद्रयान-०३ ने शुक्रवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेप घेतली. त्याचवेळी या यानामधील यंत्रणेत समावेश असलेल्या खामगावात निर्मित सिल्व्हर ट्यूबचाही अवकाशात प्रवास सुरू झाला आहे.
या सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबची निर्मिती करण्याचे कंत्राट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) खामगावातील श्रद्धा रिफायनरीजला ३ जून २०२० राेजी दिले होते. त्यानंतर अवघ्या २० ते ३० दिवसांत रिफायनरीजचे संचालक शेखर भोसले यांनी अंत्यत कमी वेळात ट्यूबची निर्मिती करून पुरवठा केला. त्याचा वापरही झाला. त्यामुळे यान उड्डाणाचा दिवस शेखर यांच्यासाठी अंत्यत उत्कंठावर्धक होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजेपासून त्यांनी यान अवकाशात झेपावण्याची प्रतीक्षा केली.
५० चांदीच्या ट्यूबचा वापर
यानातील विद्युत संरचनेत सिल्व्हर स्टर्लिंग ट्यूबचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती भोसले यांना आहे. त्या पद्धतीने इस्रोने त्यांच्याकडून ट्यूबचे काम करून घेतले. विशेष म्हणजे, त्यांनी तयार केलेल्या ५० पैकी कोणतीही ट्यूब रिजेक्ट न होता स्वीकृत झाल्याने त्यांची गुणवत्ताही इस्रोत सिद्ध झाली.
चांदीचा औद्योगिक तसेच संशोधन क्षेत्रात होत असलेला वापर यानिमित्ताने पुढे आला आहे. इस्रोतील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी देशांतर्गंत उद्योगांकडूनच सुट्या भागांची खरेदी केली. त्यामुळे या क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या देशांकडे जाण्याची वेळ आली नाही. ही बाब भूषणावह आहे.- शेखर भोसले, संचालक, श्रद्धा रिफायनरीज, खामगाव.