- अनिल गवई
खामगाव: तहसीलप्रशासनातंर्गत कार्यान्वित नैसर्गिक नियत्रंण कक्षाचा डाटा वेळोवेळी अपडेट केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून जुन्याच माहितीच्या आधारे नैसर्गिक आपत्ती कक्षाचा कारभार सुरू असून, जुन्या तारखेच्या घोळासह विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाºयांचीही नावेही ‘कर्तव्य’यादीत समाविष्ट केली जात आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षात कर्मचारी कर्तव्यावर पाठविताना इतर विभागांची चांगलीच तारांबळ उडते.
खामगाव तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने तहसील कार्यालय खामगाव येथे दरवर्षी जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. या कक्षामध्ये तहसील प्रशासनासोबतच इतर शासकीय विभाग आणि कार्यालयातील कर्मचाºयांची ‘कर्तव्या’वर नियुक्ती केली जाते. यावर्षी देखील १ जून २०१८ पासून २४ तास आपत्ती नियत्रंण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. याकक्षामध्ये तहसील कार्यालय, विक्रीकर कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी आणि नगर पालिका कार्यालयातील कर्मचाºयांना बदलत्या वेळापत्रकानुसार सुमारे ७२ अधिकारी- कर्मचाºयांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, नवीन कार्यकाळासाठी ही नियुक्ती देण्यात आली असली तरी, गेल्यावर्षीची म्हणजेच ५ जून २०१७ ते ३१ आॅक्टोबर २०१७ तारीख कायम ठेवून कार्यादेश देण्यात आल्याने अनेक विभागातील संबंधितांची तारांबळ उडाली. चूक निदर्शनास आल्यानंतर तहसील कार्यालयाकडून तशा लेखी सूचना आणि निर्देश देण्यात आले. तसेच लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला. यासंदर्भात तहसील प्रशासनातील जबाबदार अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रीया देण्यास स्पष्ट नकार दर्शविला.
पालिकेतील चार सेवानिवृत्तांना कार्यादेश!
नगर पालिकेतील चार सेवानिवृत्त कर्मचाºयांना यावर्षी रूजू होण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. पालिकेतील बी.एम. उंबरकर जुलै २०१७ मध्येच सेवानिवृत्त झाले आहेत. तर भिकाजी रेठेकर फेब्रुवारी- २०१८, चंद्रकांत सेवलकर, कडूबा खडसे मार्च २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, उपरोक्त चारही कर्मचाºयांना २०१८ मध्ये आपत्ती निवारण कक्षात कार्यादेश देण्यात आला आल्याची बाब समोर आली आहे.
माहिती अपडेट करणे गरजेचे!
आपत्ती निवारण कक्षासारखा अतिशय महत्वाचा कक्ष कार्यान्वित करताना अतिशय खबरदारी घेणे गरजेचे आहे. कक्षामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या कर्मचाºयांसंदर्भात संबंधित त्या-त्या विभागांना महसूल प्रशासनानेच निर्देश देणे अपेक्षीत आहे. मात्र, नियत्रंण कक्ष कार्यान्वित करण्यापूर्वी संबंधीत कार्यालयांशी कोणताही पत्रव्यवहार न करता तसेच माहिती अपडेट न करता कार्यादेश दिल्या जातात. या कार्यादेशामुळे तारखेसह इतर चुका असतात. त्यामुळे नंतर बदल सुचविले जात असून, गेल्या चार वर्षांपासून तहसील प्रशासनाने विविध विभागाचा डाटा अपडेट केला नसल्याचा दावा विश्वसनिय सुत्रांनी केला आहे.