गिरीश राऊत खामगाव, दि. ९- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर मोहिमेची गती वाढविण्यात आली असून, खामगाव तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. तालुक्यात एकूण ९६ गावे असून, यापैकी १३ गावे १00 टक्के हगणदरीमुक्त झाली आहेत, तर उर्वरित गावातील वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. शासन आदेशानुसार खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीच्यावतीने ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण ग्रामीण राबविल्या जात आहे. तालुक्यात एकूण आबाद गावे ९६ असून, यापैकी १३ गावांनी हगणदरीमुक्त होण्याचा बहुमान मिळविला आहे. उघड्यावर होणार्या हगणदरीचे दुष्परिणाम पाहता गावागावात वैयक्तिक शौचालय बांधण्यावर भर दिला जात आहे. तसेच शौचालय बांधण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर अनुदानाची योजना सुरू केली आहे. अशा अनुदान मिळणार्या योजनेमुळे दरवर्षी शौचालयांची संख्या वाढत आहे. सन २0१३ पासून २0१७ अशा गत चार वर्षांंत तालुक्यातील गावांमध्ये वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढावी, यासाठी शासनाच्या विविध योजनांमार्फत ६ हजार ९४१ वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्णत्वास गेले असून, नियमित वापर सुरू झाला आहे. या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पंचायत समितीमध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच गावोगावी प्रभातफेरी, पोस्टर, होर्डिंग्ज लावून जनजागृती केल्या जात आहे. शौचालय बांधण्यास अडचण नसतानाही टाळाटाळ केल्या जात असल्याने अशा गावांमधील शौचालयांची संख्या कमी असल्याने अशा ठिकाणी शौचालय नसल्यास दाखला देण्यास प्रतिबंध अशा उपाययोजनासुद्धा केल्या जात आहेत, तर ढोरपगाव व इतर काही ग्रामपंचायतींनी शौचालय न बांधल्यास स्वस्त धान्य व इतर शासकीय लाभ देण्यात येऊ नये, असा ठरावसुद्धा घेतला आहे. उघड्यावर होणार्या हगणदरीमुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. शौचालय बांधून नियमित वापर केल्यास शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा देण्यात येत आहे. तेव्हा ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाही, अशांनी शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेऊन देशाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये आपला सहभाग नोंदवावा.- किशोर शिंदे, गटविकास अधिकारी पं.स.खामगाव
खामगाव तालुक्यात हगणदरीमुक्त गाव मोहीमेला हवी गती!
By admin | Published: March 10, 2017 1:38 AM