लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित कंपनी असलेल्या महिकोमध्ये बोगस बियाणे साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून बुलडाणा पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी रात्री ६ गोडाउन सील केले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईनंतर बी.टी. कपाशीचे नमुने तपासणीसाठी घेऊन येथील गोडाउन सील करण्यात आले होते. राज्यभरातील शेतकर्यांच्या शेतामधील बी.टी. कपाशीवर यावर्षी आलेल्या बोंडअळीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने प्रत्यक्ष शेतावर जावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, बोंडअळीच्या प्रतीकारक्षम असणार्या कपाशीच्या पिकावर नेमके अचानक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आलेल्या बोंडअळ्यांमुळे बियाण्यांमधील दोष तपासण्यासही सुरुवात केली आहे. धानोरा येथील महिको कंपनीतील बोगस बियाण्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभाग व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिकार्यांनी महिकोतील सर्वच गोडाउनमधील सर्व प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांचीसुद्धा तपासणी मागील दोन दिवसात केली आहे. त्यामुळे आता सर्व गोडाउनला सील लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी नांदुरा येथील मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे आज कृषी विभागाचे पथक मलकापुरात पुढील कारवाईसाठी दाखल झाले होते. दिवसभर फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु होती. त्यासाठी अधिकारी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मलकापुरात ठाण मांडून होते.
भाजीपाला बियाण्यांचीसुद्धा तपासणी नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील महिको कंपनीमधील उत्पादन, प्रक्रिया व पॅकींग होणार्या भाजीपाला बियाण्यांसह इतर पिकांच्या बियाण्यांची तपासणी सुरू केली आहे व इतरही गोडाउनची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोडाउन सील करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही महिको कंपनीमधील बियाण्यांचे नमुने घेतले आहेत. याबाबत फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. - विजय मुखाडे, जिल्हा कृषी अधिकारी