खामगाव: येथील स्थानकातून ग्रामीण भागात नियमित आणि वेळेवर बस सोडल्या जात नाही. त्या मंगळवारी सायंकाळी पळशी बु. ही बस विलंबाने सोडण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थी रात्री ११ वाजता घरी पोहोचल्याने बुधवारी दुपारी पळशी येथील विद्यार्थ्यांसह सामान्यांनी एसटी आगारात धडक दिली.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव ते पळशी बसची वेळ सायंकाळी ७ वाजताची आहे. मात्र, ही बस कधीच वेळेवर लागत नाही. मंगळवारी या बसला विलंब झाला. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना घरी पोहोचलायला तब्बल रात्रीचे ११ वाजले. विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी बुधवारी दुपारी खामगाव आगारात धडक दिली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आगार प्रमुखांना सादर केले.
यावेळी आगार प्रमुख संदीप पवार यांच्या माघारी वाहतूक निरिक्षक मोहिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारले. या निवेदनात या पुढे वेळेवर बस न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर कृष्णा दांदळे, अनिकेत चव्हाण, जयदीप ठोसरे, सुधाकर सावदेकर, पांडुरंग रेवस्कर, नंदू लाड यांच्यासह ५० ते ६० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पळशी येथील अनेक ग्रामस्थांनीही पाठींबा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली.