- अनिल गवई
खामगाव : गेल्या दहावर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठ्याच्या ‘एक्सप्रेस फिडर’चा प्रश्न आता निकाली निघाला आहे. ‘एक्सप्रेस फिडर’साठी उपवनसंरक्षक वनविभाग बुलडाणा यांनी हिरवा कंदील दिल्याने, पाणी पुरवठा योजनेतील भारनियमनासह विविध तांत्रिक अडचणींवर मात करता येणार असून, पाणी पुरवठ्यातील मोठा अडसर दूर होणार असल्याचे संकेत आहेत.
पाणीटंचाई योजनेतंर्गत सन २००६-०७ मध्ये ‘एक्सप्रेस फिडर’ करीता परवानगी मिळाली. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला १ कोटी रूपयांचा निधी मिळाला. मंजुरी मिळाल्यापासून वन विभागाच्या विविध परवानगीसाठी प्रयत्न सुरू झाले. यामध्ये २००६-०७ ते २०१० या कालावधीत वनविभागाच्या परवानगीसाठी मजीप्राने प्रयत्न केले. त्यानंतर २०१० पासून नगर पालिकेने आपल्या स्तरावर प्रयत्न चालविले. दरम्यान, पालिकेने वीज कंपनीमार्फत एक्सप्रेस फिडरचा नव्याने प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला. दरम्यान सदर फिडरसाठी वीज वाहिनी वन आणि वन्यजीव विभागाच्या हद्दीतून जाणार असल्याने या विभागाच्या नाहरकत परवानग्या घेणे आवश्यक होते. त्यानुसार परवानगीसाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर केला. मात्र हा प्रस्ताव गेल्या १० वर्षापासून प्रलंबित होता. गेरू माटरगाव ते रोहणापर्यंत एक्सप्रेस फिडरसाठी ०.५५९ हेक्टर जमीन लागणार असल्याने तसा प्रस्ताव वन्यजीव विभागाकडे सादर करण्यात आला. मंजुरीसाठी पुढे पाठविण्यात आला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. आता वन विभागाची परवानगी मिळाल्याने ‘एक्सप्रेस फिडर’चा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक हक्क कायद्यानुसार परवानगी !
फॉरेस्ट क्लिअरंस अॅक्टच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीसाठी पालिकेकडून प्रयत्न केल्या जात होते. मात्र ही प्रक्रिया अतिशय वेळ खावू असल्याने स्थानिक वनहक्क कायदा २००६ अधिनियम २००८ चे ३ (२) अन्वये एक्सप्रेस फिडरला मंजुरी देण्यात आली. उपवनसंरक्षक बुलडाणा वनविभाग बुलडाणा यांच्या कार्यालयाकडून ही परवानगी देण्यात आली.
भाऊसाहेब फुंडकरांचे प्रयत्न फळास
राज्याचे तत्कालीन कृषी तथा फलोत्पादन मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी एक्सप्रेस फिडरच्या परवानगीसाठी वनविभागाकडे गेल्या वर्षभरापासून प्रयत्न चालविले होते. या संदर्भात मुंबई येथे संयुक्त बैठकही त्यांनी घेतली होती. आता वनविभागाने एक्सप्रेस फिडरसाठी परवानगी दिल्याने त्यांचे प्रयत्न फळास आल्याचे दिसून येते. दरम्यान स्व. भाऊसाहेब फुंडकरांसोबतच पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा, बांधकाम सभापती शोभाताई रोहणकार, नगरसेवक सतीषआप्पा दुडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला हे येथे उल्लेखनीय.
एक कोटीच्या योजनेची किंमत वाढली !
खामगाव शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत एक्सप्रेस फिडरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २००६-०७ मध्ये मंजुरी मिळविली. यासाठी १ कोटी रूपयाचा निधीही प्राप्त झाला. दरम्यान २०१४ पर्यंत परवानगीसाठी मजिप्राने प्रयत्न केले. २०१४ मध्ये हा प्रस्ताव मजिप्राने पालिकेकडे वळता केला. त्यानंतर पालिकेने आपल्या स्तरावर पाठपुरावा केला. २०१७ मध्ये पालिकेने विशेष प्रयत्नांती वनविभागाकडून परवानगी मिळविली. दरम्यान गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत ही योजना १ कोटीवरून १२७ कोटीवर पोहोचली असली तरी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नसल्याचे संकेत आहेत. गेल्या दहा वर्षात १ कोटी रूपयाला २७ ते २८ लक्ष रूपये व्याज मिळाल्याने एक्सप्रेस फिडरचा तिढा सुटण्यास मदत होणार असल्याचे दिसून येते.
पाणी पुरवठा योजनेअंतर्गत एक्सप्रेस फिडरचा प्रश्न आता कायमचा निकाली निघाला आहे. वनविभागाची परवानगी मिळाली असून या संदर्भात पुढील प्रक्रिया पालिका प्रशासनाने प्रारंभ केली आहे.
- नीरज नाफडे, अभियंता पाणी पुरवठा नगर परिषद, खामगाव.
पाणी पुरवठा योजनेच्या विविध समस्या निकाली काढण्यासाठी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच आमदार आकाश फुंडकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या योजनेला गती मिळत आहे.
- सौ.अनिता डवरे, नगराध्यक्षा न.प. खामगाव