लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील अतिक्रमण काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश असतानाही, खामगाव नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच, गल्लीबोळात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणासोबतच जाहिरात फलक काढण्यासाठीही कोणतीही उपाययोजना पालिकेकडून केल्या जात नाही. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येते.शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी या रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन करण्यासोबतच गल्लीबोळीतील अतिक्रमणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वारंवार पालिका प्रशासनाला दिल्या जात आहेत; मात्र शहरातील अतिक्रमण निर्मूलनाच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम थंडावली आहे, त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात अतिक्रमण फोफावले असून, मुख्य रस्त्यांचा श्वास या अतिक्रमणामुळे कोंडल्या जात आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी पालिकेत नवीन मुख्याधिकारी रूजू झाल्यानंतरही अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने गती घेतलेली नाही. रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन गरजेचे असताना पालिकेकडून याबाबत कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नसल्याचेच चित्र आहे. शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी हवा तेवढा पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी पोलीस प्रशासनाची आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी पथकही पाठविले होते; मात्र पालिकेतील अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतीही ‘रिक्स’ घेतली नाही. परिणामी, या पोलीस पथकाला आल्या पावली परतावे लागले. त्या अनुषंगाने शहरातील अतिक्रमकांचे मनोबल उचावत असून, आता थेट शासकीय रुग्णालय रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने अतिक्रमण केल्या जात आहे. त्याचप्रमाणे पालिका इमारतीलाही अतिक्रमणाचा विळखा आहे. शुभेच्छा आणि जाहिरात फलकाद्वारे विद्रुपीकरण!राजकीय पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच खासगी विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच चौकातही जाहिरात फलक लावल्या जात आहे. या फलक लावणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने, शहराच्या विद्रुपीकरणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
खामगावला अतिक्रमणाचा विळखा!
By admin | Published: July 15, 2017 12:51 AM