दुसरीकडे राममंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण अभियानाला शहरासह ग्रामीण भागामधे प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे सुद्धा राममंदिर निर्माण कार्यासाठी दिंडी व रामरथ यात्रेचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. प्रभु श्रीरामांची प्रतिमा रथावर ठेवून गावात दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात आले. यामध्ये महिला भजनी मंडळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील लहान मुलांनी श्रीराम, सीता, हनुमान व लक्ष्मणाची वेशभूषा करून दिंडीत सहभाग नोंदविला. दरम्यान कारसेवकांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या दिंडीतून निधीचे संकलन करण्यात आले. हा निधी नियोजन समितीकडे सुपूर्द केला जाणार आहे. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा शेतकरी नेते विनायक सरनाईक, प्रभाकर ठेंग, गजानन भगवान ठेंग, पुरुषोत्तम कदम, सरपंच भारत पानझाडे, गजानन सपकाळ, रामकृष्ण ठेंग, पुरुषोत्तम जाधव, गजानन महाराज ठेंग, शिवाजी पवार, रविराज टाले, मधुकर ठेंग, ज्ञानेश्वर ठेंग यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील राममंदिर निर्माण समितीचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खंडाळ म. येथे राममंदिर निधी संकलन अभियानास प्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:04 AM