लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला जनुना तलाव जवळपास फुल्ल भरला असून तलावातील पाण्याचा कालव्याच्या माध्यमातून विसर्ग मंगळवारपासून सुरू झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.खामगाव येथील पुरातन जनुना तलावातील गाळाचा उपसा करण्यासाठी नगर पालिका प्रशासन, भारतीय जैन संघटना आणि रोटरी क्लबच्या पुढाकारात ‘लोक’चळवळ एप्रिल महिन्यात उभारण्यात आली होती. दरम्यान, खामगावातील गाळ उपसा मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट संस्थेने १ लाख ११ हजार रूपयांची मदत दिली होती. त्यापाठोपाठ खामगाव नगर पालिका कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन दिले. तलावाच्या खोलीकरणासाठी एकदिवसाच्या वेतनासाठी पालिका कर्मचाऱ्यांना ऐच्छीक आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील विविध सामाजिक संघटना देखील जनुना तलावाच्या खोलीकरणासाठी सरसावल्या होत्या. मोठ्याप्रमाणात गाळाचा उपसा करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळ्यात जनुना तलावात पूर्णत: पाणी साचले आहे. गत अनेक दिवसांपासून कोरडा ठण्ण पडलेला जनुना तलाव आता पाण्याने भरला आहे. जोरदार पावसामुळे जनुना तलाव शंभरटक्के भरल्याने, परिसरातील पाणी पातळीत वाढ होणार असल्याचेही संकेत आहेत. त्यामुळे खामगाव वासियांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
लोकवर्गणीतून झाले होते खोलीकरण!खामगाव येथील जनुना तलावातील गाळ काढण्यासाठी लोकवर्गणी करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात ही धडक मोहिम हाती घेण्यात आली. रोटरी क्लबच्या पुढाकारातून जनुना तलावातील गाळ काढण्यास शहरातील सामाजिक संस्था तसेच नगर पालिकेच्या कर्मचाºयांनी सहभाग दिला होता. अनिवासी भारतियांकडूनही जनुना तलावातील गाळ काढण्यास मदत झाली होती. आता खामगाव येथील जनुना तलाव तुडूंब भरला आहे.