ऑनलाइन लोकमतबुलडाणा : मृग नक्षत्र २२ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचे तसेच सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यावर्षी मालाला भाव मिळाला नाही व तूरीची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांना खत व बियाणे खरेदीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे खरीप पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर खरीप पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. खरीप पेरणीचे मृग नक्षत्र अगदी जवळ येत असल्याने शेतकरीही पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याने पेरणी करीता लागणारे खत व बि-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. त्याला कारण गतवर्षी पिकांना मिळालेला अत्यल्प भाव आहे. सोयाबीन पिकाने प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपयांपर्यतचाही भाव ओलांडला नाही. तर तूरीच्या पैशातून बहुतांश शेतकरी खरीप पिकासाठी लागणाऱ्या खत बि-बियाण्याची खरेदी करून पेरणीचा खर्च भागवतात. मात्र, तूरीलाही ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शासानाने नाफेड केंद्र सुरू केले मात्र तेही अडचणीत असल्याने अनेक शेतकरी आपली तूर विकू शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ खरीप पेरणीकरिता पैसेच नसल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. मृग नक्षत्रात पेरणी साधली की पीक नक्की चांगले येते याचा शेतकऱ्यांना चांगला अनुभव आहे. मात्र खत व बि-बियाणे खरेदी अभावी पेरणी लांबली, तर उत्पादनावरही परिणाम होतो. पेरणी लांबल्यास मृग नक्षत्रात पेरा केल्यामुळे हमखास येणारी मूग व उडीद ही दोन पिके शेतकऱ्यांना घेताच येत नाहीत. त्यामुळे वेळेवर म्हणजे मृग नक्षत्रतच पेरणी व्हावी, यासाठी शेतकरी धडपड करित आहेत.
पीक कर्जाची प्रतीक्षासध्या खरीप पेरणी पूर्व कामांना वेग आला आहे. मात्र, हातात पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्जाची प्रतीक्षा आहे. बँकेतील कर्ज भरल्यानंतर पेरणीसाठी नविन पीक कर्ज घेता येते; मात्र जवळ पैसेच नसल्याने बँकेतही शेतकऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुर्नगठण करून पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खत, बियाणे खरेदीवर मंदीयावर्षी मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह अनेकांनी गेल्या महिन्याभरापासून जाहीर केल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाने ५० टक्क्यांवर सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन व बाजारपेठेची उलाढाल यावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी सुद्धा पिकाला भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. त्यामुळे खत व बि-बियाण्यांसह पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीवर मंदी जाणवत आहे.