बुलडाणा : देऊळघाट सरपंचपद एससी महिला प्रवर्गासाठी राखीव होते; परंतु एकही एससी महिला निवडून न आल्यामुळे सरपंचपद रिक्तच होते. अखेर सरपंचपदाचा तिढा सुटला असून २६ फेब्रुवारीला सरपंचांची निवड हाेणार आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी देऊळघाट ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनेल व सामाजिक एकता पॅनेलमध्ये काट्याची लढत झाली. १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर १८ जानेवारीला निकाल घोषित करण्यात आले. त्यात ग्रामविकास पॅनेलचे ९ तर सामाजिक एकता पॅनेलचे ८ सदस्य निवडून आले. सरपंचपद एसएस महिला प्रवर्गासाठी राखीव होते. परंतु एकही एससी महिला निवडून आली नाही. त्यामुळे ९ फेब्रुवारील केवळ उपसरपंचाची निवड करण्यात आली. देऊळघाट येथे राखीव प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त असल्याचा अहवाल बुलडाणा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला हाेता. नियमानुसार एससी प्रवर्गाची महिला उपलब्ध नसेल तर सरपंचपद तेवढ्या मुदतीपुरते एससी प्रवर्गासाठी आरक्षित मानण्यात येऊन सरपंचपदाची निवडणूक घेता येते. त्यानुसार येत्या २६ फेब्रुवारीला निवडून आलेल्या सदस्यांमधून देऊळघाट सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीदरम्यान कोविड-१९ बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.