दात चांगले तर आरोग्य चांगले, असे म्हटले जाते. दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत कुणीही फारसे जागरूक नसल्याने मुलांच्या दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढत आहे. चॉकलेट्स, गोडपदार्थ, चिप्स आणि जंकफूड अशा पदार्थांचे अधिक सेवन शरीरासाठी नुकसानकारक असते. या पदार्थांमुळे आजारांना निमंत्रण मिळते. तोंडावाटे अन्न शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दात, जीभ, लाळग्रंथी हे तोंडातील अवयव अन्नाच्या अधिक संपर्कात येतात. या अवयवांची जितकी काळजी घेतली जाईल, तितके मुखआरोग्य चांगले राहते.
चॉकलेट्स न खालेलेच बरे
गोड, चिकट व कडक पदार्थांमुळे दातांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे. चॉकलेट्स खाऊच नये किंवा कमी खावे, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ करावे. गोड पदार्थांमधील शर्करा, अर्थात कार्बोहायड्रेट्स दात खराब करणाऱ्या जंतूंसाठी पोषक असतात. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे स्वच्छ झाले नाहीत तर दात किडण्यास प्रारंभ होतो.
लहानपणीच दातांना कीड
जास्त गोड किंवा चॉकलेट्स खाल्ल्याने लहानपणीच दात किडतात. दातांचे आजार जडतात. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करणे, खाल्ल्यानंतर चूळ भरणे, दाताला हानिकारक असलेल्या पदार्थ्यांचे सेवन नियंत्रणात ठेवणे, या गोष्टी नियमित केल्या तर दाताचे रक्षण करता येईल, असा सल्ला दंतरोग तज्ज्ञांनी दिला. ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे दाड किडण्याचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: ७० टक्के बालकांच्या दातांना कीड लागत असल्याचे दंतरोगतज्ज्ञ सांगतात.
अशी घ्या दातांची काळजी
तोंडातील जिवाणू गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून आम्लपदार्थ सोडतात. ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात.
लहान मुलांना गोड पदार्थ जास्त प्रमाणात खायाला देणे टाळावे. कोणताही गोड खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय बालकांना लावावी.
बालकांचा सकाळ व संध्याकाळ असा दोनवेळा नियमित ब्रश करून घ्यावा.
ब्रश काही महिन्यांनी बदलावा. हिरड्यांवरून हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा. रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात.
दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला ‘पायरिया’ असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.
दंतरोग तज्ज्ञ काय म्हणतात...
विविध कारणांमुळे ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांचे दात किडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. बालकांना गोड पदार्थ जास्त प्रमाणात खायाला देणे टाळावे, तसेच ब्रश सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळा नियमित करून घ्यावा.
- डॉ. समीर पऱ्हाड, दंतरोग तज्ज्ञ.
बाळाचा पहिला दात येण्यापूर्वीपासून त्याच्या हिरड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. हानिकारक अशा जंतूंना दूर ठेवण्यासाठी हिरड्यांची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. दाताला अल्प प्रमाणात जरी कीड लागली तर तातडीने दाताच्या डॉक्टरांना दाखवावे.
- डॉ. अभय कोठारी, दंतरोग तज्ज्ञ.