लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळाऑनलाइनच सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेची घंटा वाजली परंतू शिक्षकांसाठीच. पहिल्या दिवशी मुलांचा किलबिलाट ऑनलाइनवरच ऐकायला मिळाला. कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील संपूर्ण शैक्षणिक सत्र ऑनलाइनच झाले. त्यामुळे यंदा मुलांना शाळा सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतू कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, यंदाही शाळा ऑनलाइनच सुरू करण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी सकाळीच दरवर्षीप्रमाणे शाळा भरली. परंतू यावेळी विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन घेण्यात आली. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइनच स्वागत करण्यात आले. आदिवासी बहुल गावात पोहचले अधिकारीशाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी अनेक शाळांना भेट देतात. परंतू यंदा ऑनलाइन शिक्षण असल्याने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासी बहुल गावात जाऊन शाळेला भेट दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शाळा प्रवेशोत्सव पार पडला. तर प्राथमिक स्तरावर काही मोजक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे स्वागतही करण्यात आले.
मॅडम मला बोलायचे...जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मुलांना बोलते केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी मुलांनीही मॅडम मला बोलायचे... असे म्हणून शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.
प्रवेशोत्सव साजराशिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत चारबन येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा व्यवस्थापन समिती व काही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी रा. पा. तायडे, केंद्रप्रमुख के. जी. राऊत, शिक्षक दांडगे, दीपक उमाळे, एम. जी. मोसंबे, ममता बावित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबसिंग सस्त्या, कमिस चंगळ, उदयसिंग सस्त्या, थापासिंग पटेल, प्रकाश धुर्डे, शमीम देशमुख आदी उपस्थित होते.