साखरखेर्डा : येथील महालक्ष्मी तलावात राजरोसपणे मातीयुक्त धान्य धुतल्या जात असल्याने पाणी गढूळ होत आहे़ तसेच काही नागरिक मुक्तपणे तलाव परिसराचा शौचासाठी उपयोग करीत आहे. याची दखल ग्रामपंचायतीने घेऊन पाणी अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या १८ हजार असून गावाला महालक्ष्मी तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ मागील २०१५ ते १०१८ या तीन ते चार वर्षांत पाऊस कमी पडल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. या काळात ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले होते. दोन वर्षांपासून पाऊस समाधानकारक पडल्याने तलाव भरला होता. त्यामुळे पाणी टंचाईपासून नागरिकांची मुक्तता झाली होती . आजही महालक्ष्मी तलावात पाणीसाठा ५० टक्के असून एप्रिल, मे जून महिन्यात पुरेल एवढा पाणीसाठा आहे . ते पाणी गावातील दोन जलकुंभात भरुन नागरिकांना आठवड्यातून एक वेळा सोडल्या जाते. काही नागरिक या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. गावात शुध्द पाणी पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परंतू आहे ते पाणी गढुळ होऊ नये, त्या तलावात मातीयुक्त धान्य , कपडे धुतल्या जाऊ नये , तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने दक्षता बाळगावी, अशी मागणी केली आहे .
महालक्ष्मी तलावात मातीयुक्त धान्य धुतल्या जात असून तलाव परिसराचा शौचालयासाठी उपयोग केला जातो . त्यामुळे पाणी दूषित होत आहे .
* संतोष मंडळकर .
साखरखेर्डा
महालक्ष्मी तलावावर कर्मचारी नियुक्त करण्यात येईल़ पाणी स्वच्छ कसे राहील यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येतील़
प्रकाश आढाव, ग्राम विकास अधिकारी ,
साखरखेर्डा