या रस्त्यावरून मेहकर, लोणार, साखरखेर्डा, ईसोली, हराळखेड, कारखेड, पिंपरखेड यांच्यासह अनेक गावे या रस्त्याशी जोडलेली असून, सर्व वाहनधारक या रस्त्यावरूनच प्रवास करतात. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. अनेक खेड्यांतील लोक अमडापूर येथे कामानिमित्त येत असतात. मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने, त्यांना वाहन चालवीत असताना मोठी कसरत करावी लागते. गावात प्रवेश करताच पुलाजवळ महाकाय खड्डा पडला आहे. तो मोठ्या अपघातास आमंत्रण देत आहे. वेळीच या सर्व पडलेल्या खड्ड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी त्रस्त वाहनधारक करीत आहेत. या रस्त्यावरील खड्डे दर चार-सहा महिन्यांत ठेकेदार यांच्यामार्फत भरले जात असतात. मात्र, हे खड्डे पुन्हा जैसे थे वैसे रूप धारण करतात. सध्या पावसाचे दिवस आहेत. या मोठ्या खड्ड्यामध्ये खूप पाणी साचते. वाहनधारकास त्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. याकरिता लवकर अमडापूर-मंगरुळ-नवघरे या रस्त्यावरील खड्ड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अमडापूर ते मंगरुळ नवघरे रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:37 AM