संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी यांना श्रीराम खोंड व घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांनी निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासनाकडून तोंडगा काढण्यात न आल्याने येथील घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेले ३० कुटुंबीय मतदानाच्या बहिष्कारावर ठाम आहेत. बहुचर्चित संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे घरकुल वाटपात अफरातफर करून बनावट कागद पत्राच्या आघारे अपात्राला लाभ दिल्याप्रकरणी येथील तत्कालीन ग्रामसेवक डोंगरे यांच्या निलंबनानंतर आता दुसºया तत्कालिन ग्रामसेवकावर कर्तव्यात कसुरचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावून मोकळे झालेले प्रशासन कार्यवाही करण्यास तयार नसल्याने येथील वंचित लाभार्थी आक्रमक झाले. कोद्री येथील नागरिकांनी गेल्या एका वषार्पासून न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवुन आंदोलने केली. परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक येथील घरकुल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत झालेला प्रकार दाबण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखले असून घरकुल वाटप अफरातफर प्रकरणी काही दिवस आधी एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले. तर दुसºया तत्कालीन ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी ए. एल. बोंद्रे यांनी एका पत्रकाद्वारे तत्कालिन ग्रामसेवक एस.यु.बेलोकार यांना कोद्री येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली. परंतु कारवाई करण्यात आली नाही तसेच वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचे पाऊले उचलण्यात न आल्याने येथील वंचित लाभार्थ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. तरीही प्रशासनाने येथील घरकुल प्रकरण गंभीरतेने न घेतल्याने गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील ३० कुटुंबीयांनी बहिष्कार कायम ठेवल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)
आमचा घरकुलाचा प्रश्न सुटला नसल्याने आम्ही ३० कुटूंबांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले होते. अद्याप समस्या तशाच असल्याने मतदान करणार नाही.श्रीराम खोंडमतदार, कोद्री ता.संग्रामपूर