खामगाव (बुलढाणा) : गावातील विशिष्ट समाजातील व्यक्तींशी बोलू नका, त्यांना किराणा देऊ नका, कामाला सांगू नका, चक्कीतून दळण देऊ नका, अशा सूचना बैठकीत दिल्याने त्यांच्यावर गेल्या चार महिन्यांपासून बहिष्कार टाकल्याचा प्रकार नांदुरा तालुक्यातील कोलासर येथे घडला आहे. याप्रकरणी अपमान करणे, हीन वागणूक देणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, याबाबत २ ऑगस्ट रोजी नांदुरा पोलिसात तक्रार दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांनी २४ ऑगस्टपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.
कोलासर येथील समाजाच्या पंच मंडळाने पोलिस, महसूल विभागाला आधीच निवेदने दिली आहेत. त्यामध्ये गावात गट क्रमांक ४९ ई क्लास जमिनीमध्ये ध्वज लावून ती जागा पंचमंडळाच्या सार्वजनिक उपयोग, लग्नसमारंभासाठी ताब्यात घेतली. १६ एप्रिल रोजी नांदुरा तहसीलदार व ठाणेदारांनी नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करून जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी सर्वांच्या संमतीने ध्वज काढण्यात आला. त्या ध्वजाचा पाईप जागेवर उभा होता. २९ मे रोजी रात्री काही समाजकंटकांनी कापून टाकला. सकाळी ८ वाजता त्या ठिकाणी ग्रामस्थ गेले असता दुसऱ्या गटातील काही लोकांनी दगडफेक केली. तसेच बैठक घेत विशिष्ट समाजाशी कोणीही बोलू नका, कामाला सांगू नका, दुकानातील किराणा देऊ नका, ऑटोमध्ये बसू देऊ नका, चक्कीतून दळण देऊ नका, असा सामाजिक बहिष्कार टाकल्याचे नमूद केले. त्यानंतरही ३० एप्रिल रोजी गावगुंडांनी तैलचित्राची विटंबना केली. त्यावेळी गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी गावाचे पोलिस पाटील, सरपंच व असंख्य ग्रामस्थांनी शांतता बाळगण्याचे ठरवत तक्रार केली नसल्याचे म्हटले. गावातील पोलिस पाटील हे समाजाला हीन तसेच दुय्यम दर्जाची वागणूक देतात. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, प्रशासनाने दखल न घेतल्याने तहसीलसमोर महिला-पुरुषांनी उपोषण सुरू केले आहे.
शेतरस्त्याने जाण्यासही मज्जावगावात शेतमजुरीसाठी कोणीही सांगत नाही, बाहेरगावी मजुरीसाठी गेल्यास त्या लोकांचे शेतरस्ते या शेतातून नाही, असे सांगत जाऊ देत नाहीत. शेताच्या धुऱ्याने जाताना अडवणूक करतात. त्यामुळे गावात जीवन कसे जगायचे, हा प्रश्न आहे. खालच्या दर्जाची वागणूक देत अपमानित करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पंचमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले.