हिवरा आश्रम येथे शुकदास महाराज यांनी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी विवेकानंद आश्रम या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले असून, रुग्णसेवेचा ध्यास असलेल्या व ज्यांनी रुग्णसेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या महाराजाच्या प्रयत्नाला यश येऊन, आज रोजी ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. हे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत जरी असले, तरी प्रशासनाने या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता सोमवारी तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्याम ठोंबरे यांनी हिवराआश्रम येथे जाऊन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची व तेथे असलेल्या सोईसुविधांची पाहणी केली. या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या तयारीने विविध सोईसुविधा उभ्या करणे सुरू केले.
कोट...
विवेकानंद आश्रम येथे ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत उभी आहे. रुग्णालय सुरू होण्यास काही अवधी लागेल. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, या इमारतीचा उपयोग कोविड केअर सेंटर म्हणून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
डाॅ.संजय गरकल, तहसिलदार, मेहकर