मेहकर : तालुक्यात कृषी संजीवनी माेहीम सप्ताहास सुरुवात करण्यात आली आहे़. ही माेहीम १ जुलैपर्यंत राबवण्यात येणार आहे.
खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने दरवर्षी एक जुलैला प्रचार व प्रसिद्धी सप्ताहाची सुरुवात करण्यात येते. परंतु तोपर्यंत खरीप पिकांची पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरू होऊन गेलेला असतो. त्यामुळे चालूवर्षी २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने मेहकर मंडळातील ९ गावांमध्ये सभा घेऊन कृषी संजीवनी सप्ताह सुरुवात करण्यात आलेली आहे. मेहकर मंडळातील चायगाव, पारडा, बाभूळखेड, बोरी, अंत्री देशमुख, बा-हई, दुधा, पेनटाकळी व माळखेड अशा ९ गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. पारडा येथे सभा घेऊन सभेमध्ये सोयाबीन पेरणी करताना राबवायच्या अष्ट सूत्री कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. कृषी विभागाच्या विविध योजना व त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत कृषी सहायक भास्कर पवार व गणेश तुपकर यांनी सविस्तर माहिती दिली. सभेस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मनेश यदुलवाड यांनी उपस्थित राहून हवामान शास्त्रविषयी सखोल मार्गदर्शन केले. बियाण्यांचे सुधारित वाण व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती डॉ. जगदीश वाडकर यांनी दिली. सभेस पारडा येथील सरपंच पंजाबराव तांगडे, कृषी सहायक विवेक सिरसाट व शेतकरी उपस्थित होते.
विविध विषयांवर केले मार्गदर्शन
यामध्ये प्रामुख्याने बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, नवीन वाणाची निवड, पेरणीचा कालावधी, पेरणीची खोली, बीबीएफ यंत्राचा वापर, शिफारशीप्रमाणे खताचा वापर व बियाण्यांची उगवण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी तणनाशकाचा वापर तसेच तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याबाबत मंडळ कृषी अधिकारी सुधाकर कंकाळ यांनी माहिती दिली.