चिखली : लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे मिळण्यास अडचण उद्भवली आहे. त्यामुळे जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्या वतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अॅड. सुनील हासनराव देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या १५ मे ते १५ जून या खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे व स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या लॉकडाऊनमध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना कुठल्याही प्रकारची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणे-खते वेळेवर मिळत नाहीत. प्रामुख्याने खरीप हंगामात १५ मे ते १५ जून या कालावधीतच शेतकरी बी-बियाणे व खतांची तजवीज करीत असतात. मात्र, नेमक्या याच काळात लॉकडॉऊन असल्याने शेतकऱ्यांसह कृषिकेंद्र चालक अडचणीत आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादक असोसिएशनच्यावतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खरीप हंगामाच्या काळात कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात उघडे ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास १५०० मे. टन रासायनिक खते व बियाणांची उलाढाल होते. लॉकडाऊनमुळे कपाशी बियाणे, ज्वारी, मक्का, मूग, उडीद, तूर बियाणे १० टक्के उपलब्ध होऊ शकले नाही. सोयाबीन बियाणेसुद्धा २५ टक्केपर्यंत उपलब्ध आहे. २५ मे पासून कपाशी बियाणे परवानगी येणार असल्याकारणाने कृषी सेवा केंद्रधारकांच्या अडचणीबाबत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व कृषी सेवा केंद्रांना या लॉकडाऊनमधून मुभा मिळावी, अशी मागणी अॅड. देशमुख यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.