छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत खस्ता हालत झालेली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. शिवाय दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्याने जाण्यास अनेक अडचणी येत होत्या. ही समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे प्रयत्नरत आहेत. दरम्यान, शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता; मात्र कोरोना महामारीमुळे शासनाने सुरू असलेली सर्व विकासकामे बंद केली होती; परंतु शहरातील रस्त्याची निकड लक्षात घेता नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांनी निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालविल्याने शासनाने कोरोना काळातही निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपलब्धीमुळे रस्त्याचे काम सुरळीत सुरू झाले असून, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपर्यंत रस्ता सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांची कामे मंजूर झाली होती. त्यामध्ये बीडीसी बँक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, दुसरा टप्पा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपर्यंतच्या सुमारे ५ कोटी ५० लाख रुपयांच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. रस्ता कामामुळे रहदारीस येणारे अडथळे तातडीने दूर होऊन नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांनी लक्ष घातले आहे. या पृष्ठभूमीवर कुणाल बोंद्रे यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.
शहरातील रस्ता कामाची कुणाल बोंद्रेंकडून पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:34 AM