खामगाव: नगर पालिकेतंर्गत कचरा उचल प्रक्रीयेचा कंत्राट असलेल्या कंत्राटदाराने घंटागाडी कामगारांचे वेतन थकविले. मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही तब्बल ५० दिवसांपासून या कामगारांना वेतन न दिल्यामुळे तब्बल १२० अधिक घंटागाडी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या घंटागाडींची चाके जागेवरच रूतली असून शहरातील कचरा उचल प्रक्रीया ठप्प झाली आहे.
किमान वेतनदरासाठी गत काही दिवसांपासून नगर पालिका घंटागाडी कामगार आणि कचरा उचल मक्तेदारामध्ये बिनसले आहे. ५० दिवसांपूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कामगारांना नियमानुसार वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तरी देखील मक्तेदाराकडून किमान वेतन दिल्या जात नाही. अशातच गत ५०पेक्षा अधिक दिवसांपासून मक्तेदाराने कामगाराचे वेतन थकविल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवित कामगार संघटनेने मंगळवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले.
या आंदोलनामुळे खामगाव शहरातील कचरा उचल प्रक्रीया ठप्प झाली आहे. या आंदोलनात मनसे कामगार संघटना अध्यक्ष विनोद इंगळे, विकी शिंदे, शिवदास घोगरे, प्रवीण आठवले, प्रेम हट्टेल, आकाश शिंदे, संतोष महाशब्दे, संजय भवन, निखिल मांगले यांच्यासह तब्बल १२० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत.